कदाचित आम्हीच ते जगावेगळे नमूने असू जे भारत पाकिस्तान T20 World Cup ची Live हाय व्होल्टेज मैच बघायची सोडून गडकिल्ले आणि दुर्ग भटकंतीला निघालो होतो…..
असं म्हणतात की, “मार्ग जितका अवघड आणि खडतर आसतो तितकच यशप्राप्तिच सुख हे मोठ आणि गोड असत” आणि खरोखरच याची प्रचिती ९ तासाच्या अखंड आणि अथक ट्रेक नंतर हरिश्चंद्रगडावर आणि विशेषत: कोकणकड्यावर पोहोचल्यावर आली.

जेव्हा २ महिन्यापूर्वीच ‘SG Trekkers’ सोबत हरिश्चंद्रगडावर खीरेश्वर, टोलारखिंडमार्गे गेलो होतो तेव्हाच खऱ्या आर्थाने हरिश्चंद्रगडाच्या आणि तेथील निसर्ग सौदर्याच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा ऐकलं होत की ‘नळीच्या वाटेने’ हरिश्चंद्रगड हा खूप अवघड पण भारी ट्रेक आहे. आणि तेंव्हाच ठरवूनही टाकल होत की पून्हा हरिश्चंद्रगड करायचाच आणि तो ही नळीच्याच वाटेने. आणि तो योग लवकरच जूळून आला, “SG Trekkers” च्या ‘विशाल’ ने “नळीच्या वाटेचे” ट्रेक शेड्यूल Plan केल्या-केल्या लगेच सांगून टाकलं “भावा, आपण तर आहे बघ ट्रेक ला”…..!!

शनिवारच काम गुडाळून संध्याकाळी थोडी लवकरच कामावरून कल्टी मारली आणि पटापट अवरा आवर करून धावत पळत नाशिकफाटा जवळ केला. तेथे ऑलरेडीच ‘मिलिंद’ आणि ‘रुपेश’ पोहोचले होते. नेहमी माझ्या सोबत असणारा माझा जिवलग मित्र ‘भगवान’ या वेळी मात्र शिवाजीनगरहून त्यांच्या सरांसोबत येत होता. साडे-आठ नऊ च्या सुमारास बस नाशिकफाट्याला आली. नंतर पुढे वाटेत ‘भोसरीतुन’ सर्वात शेवटी माझे सहकारी मित्र ‘पुरुषोत्तम’ यांना लास्ट पिकअप करून ‘हरिश्चंद्रगडाच्या’ दिशेने मार्गस्थ झालो…!! आणि मग सुरु झाला तो आमचा प्रवास ‘स्वप्नांच्या दिशेन’, ‘स्वप्नातल्या वाटेच्या दिशेने’….!!
या ‘भटकंती’ साठी जवळ पास २५ ते ३० ‘हौशी भटक्यां’ मेळा जमला होता. यात बऱ्यापैकी तरुण वर्गा पासून ‘शिदोरेकाकांसारखे’ साठ-पासस्ट च्या घरातील सेवानिवृत्त अनुभवी आणि चिरतरुण असं व्यक्तिमत्व ही सोबत होतं.
प्रवासात नेहमीप्रमाने गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, आणि बघता सगळे त्यात अक्षरश: रमून गेले. आणि त्यायच भर म्हणून की काय तर, “अप्सरा आली” या गाण्यावर ‘किरन’,’स्मिता’ आणि ‘सिद्धी’ यानी केलेल्या नृत्याविष्काराची हलकीशी झलक तर अप्रतिमच…!! खरचं कलेची एक ‘खास देण’ लाभली आहे त्यांना..!!
आणि शेवटी ‘शिदोरेकाकांनी ” वाजले की बारा” या लावणीवर धरलेला ठेका पाहूनतर “शिट्या” मारन्याचा मोह आवरता आला नाही…..!!!!
नारायणगाव जवळ चहा-पानासाठी थोडा थांबा घेतला. आगोदर आठवडाभर मस्का मारल्यानंतर सिद्धीने मस्तपैकी ‘साजूक तुपातला शिरा’बनवून आणला होता. (आणि तो हि एका Cadbury च्या बदल्यात बरं का)  चहा-पानाचा कार्यक्रम उरकून पुन्हा प्रवास झाला. योगायोगाने बसमधे Radio होता आणि त्यावर ऐकलेली Live Commentary व सोबत केलेला जल्लोष….!!
आणि तीच जुनी पण भूतकाळातील रम्य बालपण डोळयासमोर आणनारी Tune….!!
“ये लगा BSNL चौका Connecting India….!!”
वाह क्या बात है… अविस्मरणीयच…!!!

जवळपास रात्रीच्या आडिच वाजता आम्ही ‘कोकणकड्याच्या’ पाठीमागे पायथ्याशी असणाऱ्या ‘बेलपाडा’ गावात पोहोचलो. नव्या जुन्या सर्व मंडळींनी आप-आपला परीचय करून दिला. ‘राहूल’ आणि ‘मिलिंद’ ने संपूर्ण ट्रेकची एकंदरीत रूपरेषा समजावून दिली.
पहाटे साडेतीनच्या सुमारास गावातील एका वाटाड्याला सोबत घेउन आम्ही नळीच्या वाटेच्या दिशेने मार्गस्थ झालो. नळीची वाट म्हणजे तरी नेमक काय ओ ??? तर, “कोकणकड्यावरुण वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रचंड लोटाने कोरलेली एक बिकट आणि अनवट वाट”……!!
गावातून बाहेर पडत असताना भूंकनाऱ्या कुत्र्यांमुळे पहाटेच्या त्या नीरव-शांततेला कुठेतरी तडा जात होता. माळराणातुन चालताना वाटेतील आजुबाजूच्या नुकत्याच बहरलेल्या करवंदीच्या फुलांचा दरवळणारा सुवास तर अगदी एखादया कीमती अत्तरा सम भासत होता. अर्ध्या पाउन तासाच्या पायपिटीनंतर कोकणकड्याच्या अगदी पायथ्याशी पोहोचलो. आणि आता येथून पुढे लागणार होता तो आमचा खरा कस…!!
वाटेत असणाऱ्या मोठ्या मोठ्या शिळांमुळे नळीचीवाट ही खुपच बिकट आणि खडतर होत जाते. या वाटेत प्रामुख्याने कठिन आणि जवळपास १५ ते २० फुटांचे सरळ उभ्या चढनिचे ‘चार’ Rock Patches आहेत. यासाठी प्रस्तरारोहनाचे सुरक्षा साहित्य (Rock Climbing safety tools) सोबत असणे हे आवश्यकच. साडेपाच सहा च्या सुमारस पहिला Rock Patch अगदी नियोजनबद्धरीत्या पार केला. पहिल्या आणि दुसऱ्या Rock Patch मधे तसं अंतर फारसं कमीच आहे. तो Rock Patch ही आम्ही अगदी आखीव सुसूत्रतेने पार केला, यात मोलाचा वाटा होता तो ‘राहुल’ ‘मिलिंद’ आणि ‘दीपकचा’….!! “भावांनो, तुमचे Efforts हे खरोखरचं उल्लेखनिय…!!

आता या दोन Rock Patch नंतर पोटात चांगलेच कावळे ओरडायला लागले होते. पुण्याहुन निघतानाच सर्वांनसाठी पार्सल नाष्टा सोबत घेतला होता. ‘मेथी पराठे आणि लिंबाचं लोणचं’ असा फक्कड बेत होता नाष्ट्याला. यासाठी ‘सिद्धीचे’ विशेष आभार असा छान मेन्यु अरेंज केल्याबद्दल. सह्यकडयांच्या सानिध्यात त्यावर मस्तपैकी ताव मारून आम्ही तिसऱ्या Rock Patch कड़े आगेकूच केली.
कोकणकड्याच्या कातळकड्यातुन आणि कड्याकपारीतुन मार्गक्रमण करीत असताना सभोवती दिसणाऱ्या या ‘उंचच-उंच गगनभेदी’ आणि ‘अतिप्रचंड’ अश्या कातळकड्यांकडे पाहून ‘कविवर्य’ ‘वि.दा. करंदिकरांच्या’ कवितेतील दोन ओळी चटकन मनात येउन गेल्या….
” हिरव्या पिवळ्या माळावरून”
हिरवी पिवळी शाल घ्यावी !
“सह्याद्रीच्या कड्याकडून”
छातीसाठी ढाल घ्यावी…!!

तिसऱ्या Rock Patch जवळ पोहोचल्यावर सोबत असणाऱ्या ‘वाटाडया’ आणि ‘राहुल’ ने अगदी कौषल्यपूर्णरित्या या Rock Patch वरती जाऊन रोप एका घट्ट ठिकाणी बांधला, आणि याच रोप चा आधार घेत एक-एक करून हळू हळू सर्वजण वरती पोहोचलो. या  Rock Patch ने तर आम्हा सर्वांचा चांगलाच घाम काढला होता राव. मागील दोन-तीन Rock Patch च्या यशस्वी चढ़णीने बऱ्यापैकी सर्वांना चांगला Confidence आला होता. आणि त्यामुळेच चौथ्या रॉक पैचचा इतका त्रास जाणवला नाही…

उन्हाची कोवळी कीरणे कधीच निघून गेली होती आणि आता सूर्य बऱ्यापैकी तळपायला लागला होता त्यामुळचे अंगाची लाही-लाही होत होती. साडे-अकरा बाराच्या सुमारास आम्ही एकदाचे कोकणकड्यावर  पोहोचून सुखावलो….!!

कोकणकड्याचे ते ‘अजस्त्र’ आणि ‘रौद्ररांगडे’ रूप डोळयात साठवून, थोडा फोटोंचा मनमुराद ‘क्लिक-क्लिकाट’ करून कोकणकड्यावरील ‘भास्कर दादांची’ ‘टुमदार झोपडी’ जवळ केली. दोंहपारच्या जेवणाचा झक्कास बेत तेथे आखला होता यात मेजवाणीला ‘गरमागरम कडी’, ‘बाजरीची कडक भाकरी’, ‘मिक्स व्हेज’ ची भाजी सोबत झंझणीत ‘हिरव्या मिरचीचा ठेचा’ आणि घमघमित सुवासाच्या ‘इंद्रायणी तांदळाचा भात’ आणि शेवठी गावरान फ्रीज (माठ) मधील थंडगार पाणी, मगं काय ‘आत्मा तृप्तच’….!!! आणि आता येवढं समधं भरपेठ खाल्लयं म्हणल्यावर ‘वामकुक्षी’ शिवाय पर्यायच नव्हता…..!!

थोडया विश्रांतीनंतर परतीच्या मार्गाने खाली परतताना गडावर थोड़ी भ्रमंती करीत ‘हरिश्चंद्रेश्वर’, ‘श्री गणराया’ आणि ‘केदारेश्वराच्या’ भव्य शिवलिंगाला नमस्कार घालून टोलारखिंडीची पकडली.अडीच तीन तासात खाली खिरेश्वर गावात पोहोचलो.

आमचा नेहमीचा म्होरक्या असनाऱ्या ‘विशालची’ प्रकृती थोडी बरी नसल्याने तो आम्हाला रात्री ‘बेलपाड्यात’ पोहोचवून दुसऱ्या दिवशी ‘खिरेश्वर’गावात आमची वाट पाहत होता. “विशाल, या संपूर्ण ट्रेक मध्ये भावा तुला खुप मिस केलं रे”….!!
संध्याकाळचा सूर्य बऱ्यापैकी मावळतीला पोहोचला होता, क्षितीजकडा लालच लाल झाली होती आणि आता आमचा पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला होता. रात्री अकरा साडे अकरा सुमारास सर्वांना निरोप देऊन चिंचवड ला पोहोचलो…
१४ – १५ तासांच्या अखंड आणि खडतर ट्रेक मुळे पायांच्या अक्षरश: खूंटया झाल्या होत्या, आणि संपूर्ण शरीर वेदनेने किंचितसे विव्हळत होत. पण मनाला मात्र त्याच काहीच वाटत न्हवतं. कारण माझ चंचल मन आजूनही तिकडे ‘कोकणकड्यावरती’ आणि ‘हरिश्चंद्रगडावरतीच’ रेंगाळत होतं आणि त्याच अविस्मरणिय आठवणींच्या डोहात कधी शांत आणि गाढ झोप लागली काही कळलंच नाही…..!!!

रविंद्र इनामदार.
(एक हौशी सह्यभटका)

Shares
Share This

Share This

Share this post with your friends!

Shares