तसं तर कळसूबाई शिखराची एक अंतरीक ओढ लहानपणा पासूनच मनात होती. इयत्ता ४ थी भूगोलाच्या पेपरात हमखास विचारला जाणारा प्रश्न – “महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्यांची उंची किती?” उत्तर आम्हाला तोंडपाठ असायचं “महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि उंची १६४६ मीटर” बाकी आता ते नेमकं महाराष्ट्रात कुठे आहे पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला की उत्तरेला हे काय आम्हाला ठाउक नव्हतं..!! तेव्हा पासूनच कळसूबाई शिखर हे मनात घर करून होते. या शिखराला सह्याद्रीचं एव्हरेस्टदेखील म्हणतात. अश्या या कळसूबाई शिखराला गवसणी घालायचा योग २० डिसेंबर २०१५ ला जमून आला तो ही SG Trekkers मूळे, त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार, आणि विशेषत: विशाल काकडे याचे..!!

पुण्याहून कळसूबाईच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला तो शनिवार १९ डिसेंबर २०१५ च्या रात्री १०.३० वाजता. बस मध्ये प्रवासात गप्पा-टप्पा, दंगा-मस्ती, गाण्याच्या भेंड्या खेळत-खेळत रात्री २ ते २.३० च्या सुमारास आम्ही कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या ‘बारी’ या गावात येउन पोहोचलो. गावातील एका मंदिरात थोडा वेळ विसावा घेतला. जवळ पास २५ ते ३० जनांचा ग्रुप होता आमचा. नेहमी प्रमाने प्रत्येकाने आप-आपला परिचय आणि थोडक्यात या पूर्वीच्या ट्रेकिंगचा अनुभव देखिल शेअर केला. ज्योती कारंडे यांनी नुकत्याच जाउन आलेल्या आणि प्रत्येक ‘हार्ड कोअर ट्रेकरचे’ स्वप्न असलेल्या ‘A.M.K’ (अलंग, मदन आणि कुलंग) ट्रेकचा खूप छान अनुभव शेअर केला होता. पाहू आता आमचा AMK चा योग कधी जूळून येतो ते…!!  मंदिरा जवळील एका घरात चहा आणि नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गरमा-गरम चहा आणि पोह्यावर यथेच्छ ताव मारून ३ ते ३.३० च्या सुमारास कळसूबाई शिखर मोहिमेची सुरवात झाली.

डिसेंबर महीना असल्याने थंडीचा कडाका तर चांगलाच होता, या बोचऱ्या थंडीत कसं आणि काय होणार ट्रेकचं असचं वाटत होते. पण एकदा भर-भर चालायला सुरवात केल्यावर पहिल्या अर्ध्या तासात थंडी कुठच्या कुठे पळून गेली काही कळलच नाही. ट्रेक फ्रंट लीडला विशाल होता आणि बेक एंड ला आलेख होता, मध्ये मी आणि भगवान चंगू-मंगू 😝 आणि बाकीचे सर्वजण..!!

पहाटेच्या त्या नीरव शातंतेला भंग करणारी रातकिड्यांच्या कीर-किर, आमच्या सर्वांच्या बोलण्याचा आवाज, सोबतीला असंख्य चांदण्याचा शीतल प्रकाश आणि समोरच्या पाय वाटांवरचा काळोख चिरणाऱ्या आमच्या सर्वांच्या हातातील भीर-भीरणाऱ्या टॉर्चची लाईट..!! असा एकंदरीत अप्रतिम नजारा होता👌.  खाली पाऊल वाटांवरच्या दगड धोंड्यांकडे लक्ष देत आणि वरती आभाळातील अगणित चांदण्यांना निरखत आमचा मार्गक्रमण सुरु होता. वातावरण इतके स्वच्छ होते की आकाशगंगेतील छोट्या-छोट्या चांदण्या देखिल अगदी स्पष्ट दिसत होत्या. शहरात कुठली आलीये असली पर्वणी म्हणूनच असं आड-वाटांवरील भटकंती मनाला अगदी स्पर्षून जाते..!!

कळसूबाई शिखराला प्रामुख्याने तीन ते चार मोठ्या-मोठ्या लोखंडी शिड्या आहेत, त्या शिड्या जरा हलत्या आणि काही ठिकाणच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या अस्वथेतल्या आहेत त्या मूळे अगदी बेताने आणि निरखून असा आमचा मार्गक्रमन चालू होता. ‘बारी’ गावातून कळसुबाई शिखरावर पोहोचण्या साठी साधारणत: तीन तासाचा अवधी लागतो. पहिल्या दोन शिड्या पार केल्यावर थोडा वेळ विश्रांती घेउन पुन्हा कळसूबाईच्या दिशेने आम्ही आगेकूच केली…!!

आडिच-तीन तासाने आम्ही बऱ्यापैकी कळसूबाई ट्रेक च्या उत्तरार्धात पोहोचलो होतो. शेवटच्या एक दोन शिड्या आम्ही जरा घाई घाईने चढ़ल्या कारण आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरून सुर्योदयाचा तो अप्रतिम नजारा पहायचा होता. शिखराची शेवटची चढण जरा अवघडच होती इतर सर्व चढणीच्या मानाने. आम्हा सर्वांची लगबग चालू होती आणि इकडे नेहमी प्रमाने सूर्यदेव आपल्या नित्य नियमाच्या ड्युटी वर येण्याच्या मार्गावर होते, गावरान भाषेत सांगायचं झालं तर ‘तांबडं फूटण्याचा तो काळ’ अश्या प्रसन्न प्रात:काळी महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवरून अवती-भवतीचा नवचैतन्याने बहारलेला अजस्त्र आणि रांगडा सह्याद्रि न्याहाळताना एका वेगळयाच आनंदलहरींचा संचार मानत होत होता..!!

सहा ते सव्वा सहाच्या सुमारास आम्ही सर्वजण कळसूबाई शिखरावर पोहोचलो. आणि आम्हाला हवं आसलेला सूर्योदयाचा अभुतपूर्व नजारा डोळयात, मनात आणि कैमेरात टिपत होतो..!! खरचं खुप मनमोहक नजारा होता तो. दिवसभर आग ओखणाऱ्या सूर्य-नारायणांची ती एक वेगळीच छटा..!!  सर्वजण तो नजारा पाहण्यात कसे अगदी दंग होउन गेले होते..!! Mind Refreshment आणि Mind Relaxation म्हणजे काय? ते नेमकं हेच असावं बहुदा..!!

कळसूबाई शिखरावरती ‘कळसूआईचे’ एक छोटसं आणि छानसं मंदिर आहे, जेम-तेम तीन-चारजण आत बसतील एवढसं. कळसूआईचे दर्शन घेउन, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराला गवसणी घातल्याचे एक वेगळचं समाधान मानत येउन गेलं..!! कळसूबाई मंदिराच्या अवती-भोवती थोडीशी विस्तीर्ण जागा आहे आणि आजुबाजुने संरक्षक लोखंडी रेलिंग आहेत. समोरच भंडारदऱ्याचा प्रचंड असा पसरलेला जलाशय आहे, पूर्वेला अलंग,मदन,कुलंग आणि हरिश्चंद्रगड  दृष्टीक्षेपात पडतो अणि अवती-भोवतीचे सह्याद्रिचे कातळकडे, सुळके डोंगर रांगा लक्ष वेधून घेतात.

आम्ही बराच वेळ शिखरावरुन आजुबाजूचा निसर्ग आणि सह्याद्रिच्या लांबच-लांब पसरलेल्या पर्वत रांगा न्याहाळत होतो. आणि मनमुराद फोटोग्राफिचा आनंद लूटत होतो. नेचर फोटो, ग्रुप फोटो, सेल्फी, सोलो पिक आणि ज्याला जसे योग्य वाटेल तश्या त्या सर्व आठवणी कैमेरात कैद करत होते..!! सविता मैमचा मी क्लिक केलेला एक फोटो त्यांना खुप आवडला. त्यानी खुप कौतुक ही केलं. थोरा-मोठ्यांकडून अश्या प्रकारचं कौतुक म्हणजे आपल्या छंदाला दीलेलं एक प्रोत्साहनच नाही का..!!

साडे ९ ते १० च्या सुमारास आम्ही शिखरावरून खाली उतरण्यास सुरवात केली. पहिल्याच उतरणीनंतर एक विहीर लागली, तेथील थंडगार पाणी प्राशन करून एक-एक करत लोखंडी जीणे उतरायला सुरवात केली. दोन आडिच तासात आम्ही खाली ‘बारी’ गावात पहोचलो.!!

गावातून परतत असताना वाटेत एका जागी भोजन उरकून पुण्याचा रस्ता पकडला. महाराष्ट्रातील एव्हरेस्टला गवसणी घातल्याचा एक वेगळाच आनंद त्या संपूर्ण परतीच्या प्रवासात ओसंडून वाहत होता..!!

आनंद कळसूबाई शिखराला गवसणी घातल्याचा,
आनंद लहानपणीच्या स्वप्नांना गवसणी घातल्याचा..!! ✌✌

✒ रविंद्र इनामदार 

👉 थोडीशी उपयुक्त माहिती:-
ठिकाण – कळसूबाई शिखर
पायथ्याचे गाव – बारी
समुद्र सपाटी पासूनची उंची -१६४६ मीटर
ट्रेक दिनांक – २० डिसेंबर २०१५
पोहचण्याचा मार्ग
पुण्याहून :- नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – आकोले – राजूर – बारी
एकूण अंतर १७० किमी.
मुंबईहून :- कसारा – इगतपुरी – घाटी – बारी
एकूण अंतर १५५ किमी.
जवळचे प्रेक्षणीय स्थळ – भंडारदरा (शेंडी गाव)
एकूण अंतर १० किमी बारी गावापासून.

Shares
Share This

Share This

Share this post with your friends!

Shares