Kataldhar Waterfall Trek

सकाळची 6:50 ची लोणावळा लोकल मी चिंचवडवरून पकडली , बाकीचा ग्रुप शिवाजीनगर वरून याच लोकल मध्ये बसला होता. पुणे ते लोणावळा हा प्रवास तसा खूपच छान आहे आणि पावसाळ्यात तो अधिकच नयनरम्य होतो. कुठे तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या , तर कुठे हिरवेगार डोंगर, तर कुठे त्या डोंगराच्या कुशीतून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, तर कुठे त्या एक्सप्रेस वे वर आपल्या लोकलशी स्पर्धा करणाऱ्या गाड्या.
हा १ तासाचा प्रवास करून आम्ही लोणावळ्याला पोहचलो आणि तिथे आमचा स्वागत केलं पावसानं ! जणू काही तो आम्हाला घ्यायलाच आला होता.
मग सगळां ग्रुप एकत्र आला आणि कळलं की काही members मागेच राहिले आहेत, म्हणून मग नाश्ता करून वाट पहायची अस ठरलं. हॉटेल कडे जाताना गप्पामधून समजलं की मागच्यावर्षी हा ट्रेक करताना वाट चुकली होती आणि मग उशीर झाला होता. ऐकून थोडी भीती वाटली पण All izz well म्हणून स्वतःच स्वतःची समजूत काढली.
आम्ही सगळे मग एका उडपी हॉटेल मध्ये गेलो. हा माझा पहिला असा ट्रेक असेल जिथे पोह्याच्या सोबतीला इडली वडा मिसळ उपमा असे options मिळाले.
तस तर आम्ही एका ग्रुप मध्ये होतो पण ह्या ग्रुप मध्ये देखील छोटे छोटे ग्रुप तयार झाले होते, एक ग्रुप होता कॉलेज students चा, तर दुसरा roommates चा, तर एक नुकतीच ओळख झालेल्या मित्राचा आणि जे कोणी ह्या एकापण ग्रुप मध्ये नव्हते असे आम्ही तिघे एका टेबलवर बसलो होतो. सुरवात फॉर्मल गप्पांनी करून आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली. आमचा नाश्ता होई पर्यंत आमचे मागे राहिलेले मेंबर्स पण आम्हाला join झाले.

सकाळी 9:30 ला आम्ही आमचा ट्रेक सुरू केला. लोणावळ्यातून आम्ही ट्रेक लीड राहुलला follow करत आणि पावसाला सोबत घेऊन तुंगार्ली dam कडे निघालो.
Dam पर्यंत कार मधून येणार पर्यटक आमच्या बाजून वेगाने जात होते आणि त्याच्या सोयीसाठीच म्हणून की काय वडापाव, मक्याची कणस , चहा, भजी अस या वातावरणाला पूरक पदार्थ देखील उपलब्ध होते. आम्ही मात्र रस, रूप आणि गंध या इंद्रियांवर ताबा ठेवत आमच्या ultimate goal कडे चालत होतो.

अजूनतरी पायाखाली डांबरी रस्ता होता पण dam cross करून झाल्यावर एक गाव लागलं आणि आता रस्त्याचं डांबरीकरण कमी होत होत आणि कच्या रस्त्याची चाहूल लागत होती. आता नागमोडी दगडी आणि चिखलाचा रस्ता चालू झाला. तो रस्ता संपल्यावर आम्ही परत एक डांबरी रस्त्याला लागलो जो की लोणावळ्यातूनच आला होता. आता आमच्यासमोर परत एकदा उंच हिरवेगार डोंगर आणि मोगऱ्याच्या माळाप्रमाणे दिसणारे धबधबे होते. मध्येच हे सर्व काही ढगांच्या पडद्याआड लपायचे तर कधी लख्ख प्रकाशात दिसायचे. हा निसर्गाचा लपंडाव पाहण्याची मज्जा काही औरंच !
आता आमचा खरा ट्रेक चालु होणार होता. आम्हाला आता उल्हास खोऱ्यामध्ये उतरायचं होत आणि ते सुद्धा जंगलातल्या पाऊलवाटेने. ट्रेक lead राहुलने आम्हाला पुढच्या वाटेची कल्पना दिली आणि introduction राऊंड घेतला. अजूनही सर्वंजण आप आपल्या ग्रुप सोबतच होते.
आता आम्ही सर्वजण निसरड्या पाउलवाटेन एका रांगेत चालायला लागलो मधेच कोणी पडत होत तर कोणी कोणाला तरी सावरत होत. थोडं समोर गेल्यावर दोन पाण्याचे ओढे लागले. त्या थंडगार पाण्यातून जाताना बुटामध्ये आता पूर्ण पाणी गेलं होतं. तळपायांना खूप बर वाटलं.
जंगलाच अस स्वतःच एक वेगळं रूप असतं. इथून चालताना कधी वाकून जावं लागत होत तर उडया मारून. डोक्यावर काही उंच, तर काही पसरलेली झाडी, शेवाळी चादर पांघरून बसलेले दगड, मधेच कधी पक्ष्यांचे तर कधी बेडकांचे येणारे वेग वेगवेगळे आवाज, सूर्यप्रकाशाची जमीनीवर येण्यासाठीची धडपड, तर कुठे झाडाच्या पानांनवर अडकून पडलेलेे पावसाचे थेंब. हे सर्व पाहात, अनुभवत आम्ही आपले पाउलवटेने जात होतो.
आता सगळेच थोडे थकले होते आणि तितक्यात आम्हाला एक छोटा धबधबा लागला. मग काय, सगळे जण स्वतःच्या बॅग्स बाजूला ठेवून मनसोक्त भिजायला गेले. मग फोटो काढून झाले आणि परत पुढचा प्रवास चालू झाला.

ह्या जंगलामध्ये कोणी चुकू नये म्हणून कोणीतरी खुण म्हणून झाडांच्या फांद्यांना कापडाच्या पट्ट्या बांधून ठवल्या होत्या,तर कोणीतरी दगड रचून ठवले होते. ह्या खुणा शोधत आम्ही देखील आमची वाट काढत होतो.
आता आम्ही आमच्या final destination जवळ आलो होतो ,पण धबधबा काही अजून दिसत नव्हता, पाण्याचा आवाज मात्र कानांवर पडत होता.
एक छोटी टेकडी चढल्यावर एक सुंदर,उंच,देखणा, रुबाबदर आणि महाकाय असा धबधबा आम्हाला दिसला, कातळधार !
ट्रेक lead राहुलने सांगितलं की आपल्याला अजून थोडं वर जायचं आहे. पाऊसाची उघडझाप चालूच होती.वर जायची वाट पार चिखलानी भरलेली, परंतु खूप छोटी होती. एक मोठा ग्रुप खाली येत होता म्हणून आम्हाला थांबावं लागलं. पाहता पाहता त्या वाटेवर ट्रॅफिक जॅम झालं. राहुल ने coordinate करून दोन्ही ग्रुपला वाट करून दिली. वरून येणारे लोक पार चिखलाने माखून येत होते. त्यांची ही अवस्था पाहून, उतरताना आपल काय होणार हे दिसत होत.

आता आम्ही धबधब्याच्या पायथ्याशी पोहचलो. काही लोक अजून समोर जाऊ लागले तर काही तिथेच जवळच असलेल्या दगडी गुहेत बसून दुरूनच ते रूप न्याहाळत होते. जरी मी माझा कॅमेरा आणलेला होता तरी देखील तो अजून बॅग मधून काढला नव्हता पण आता मात्र मला हा मोह आवरत नव्हता. पावसाने थोडी पाठ फिरवली आणि मी पट्कन कॅमेरा काढला आणि ४-५ फोटो काढले.
धबधब्याजवळ वातावरण पण विलक्षण सुंदर होत. त्याचा आवाज त्याच्या विशाल रूपाची जाणीव करून देत होता. ते पाणी खोल वाहत जाऊन जंगलाच्या पोटांत जात होत.
समोर हिरवीगार डोंगररांग आणि त्यातुनच अधून मधून राजमाची किल्ला आपलं दर्शन देत होता. त्या पाण्याचे तुषार पावसाच्या थेंबांसोबत मिसळून अंगावर येत होते.

आता मात्र पोटामध्ये कावळे ओरडत होते. सर्वांनी आप आपल्या बॅगांमधून खायचे पदार्थ काढायला सुरवात केली. बिस्कीट, चिप्स, थेपला, सँडविच जे काही निघत होत ते लगेच संपून जात होत. ट्रेक सुरू करताना जे छोटे छोटे ग्रुप झाले होते ते आता खऱ्या अर्थाने एकत्र येत होते. खरच भुकेमध्ये सगळ्यांना एकत्र आणण्याची क्षमता असते अस ऐकलं होत , आज ते पाहिलं सुद्धा !
खूप सारे फोटो काढून आणि मग एक ग्रुप फोटो काढून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आमच्या नशिबानं, आम्ही उतरत असताना कोणताही ग्रुप चढत नव्हता म्हणून आम्हाला चिखलातून उतरणं त्यामानानं सोपं झालं. शिवाय आमचे ट्रेक लीड राहुल आणि अमोल ह्यांचा अनुभव पण कामाला आला.

परतीच्या प्रवासात सगळेजण आप आपले ग्रुप सोडून आता आपल्या नवीन मित्रांसोबत मनसोक्त गप्पा मारत चालत होते. हीच तर असते ट्रेकची मजा, नवीन ओळखी, नवीन मित्र,नवीन गप्पा आणि नवीन अनुभव.
परतीचा प्रवास अजून जास्त थकवणारा होता कारण आता आम्हाला उल्हास खोरे चढून जायचे होते. त्यामुळेच की काय वापस येताना आम्हाला ४ तास लागले. मध्ये लागलेल्या छोट्या धबधब्या मध्ये परत एकदा भिजून झाले.

लोणावळ्याला पोहचल्यावर परत एकदा उडपी हॉटेल मध्ये नाश्ता झाला. मी फक्त चहाच घेतला. इथे बसल्यावर आपल्याला पाय असल्याची जाणीव झाली. सगळ्यांनी पटापट नाश्ता करून धावत पळत ७:४० ची लोकल पकडली आणि परत भेटण्याच्या आशेने आपापला मार्ग पकडला.

Written By

Vishvas Trikutkar

What do you think about this post?
Share your thoughts; Please, leave A comment.

6 Responses

Leave a Reply

Upcoming Activities

Velas Turtle Festival Eco Tour

Anjarle Turtle Festival Eco Tour

Recent Article

Facts about Velas Turtle Festival
February 28, 2019
Andharban Trek
January 1, 2019
एका भटक्याचं सुख
December 18, 2018

Get a Question?

Do not hesitage to give us a call. We are an expert team and we are happy to talk to you.

+91 8983898528

sgtrekkers@gmail.com