उकसण आणि पाल लेणी

वेळ सकाळी ८ ची; मी आणि राहुल जांभिवली गावात एका कार्यक्रमासाठी चाललो होतो, जांभिवली गाव कामशेत पासून पश्चिमेला २२ किमी अंतरावर आहे. पण आमची गाडी आम्ही उकसन च्या दिशेला फिरवली. उकसन हे गाव कामशेत पासून उत्तरेला १६ किमी अंतरावर आहे. काम्ब्रे-गोवित्री गावाच्या पुढून डावीकडचा रस्ता थेट जांभिवली गावात अन उजवीकडचा रस्ता अंदर मावळात जातो.
आमची गाडी उकसन गावात येऊन थांबली; उकसन गाव हे तिन्ही बाजूनी उकसन धरणाच्या पाण्याने वेढल गेल आहे. या गावाच्या समोरील डोंगरात २ प्राचीन लेण्या वजा गुहा आहेत ज्या कि दुर्लक्षित आहेत. उकसन आणि पाल अशी या लेण्यांची नाव जवळील असणाऱ्या गावांवरून पडली आहेत.
गावामध्ये विचारपूस केली तर समजल गेली कित्येक वर्ष गावातल कोणी त्या दिशेला जास्त फिरकल नाहीये. एका सद्गृहस्थाच्या घरी पाणी पिऊन आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन डोंगर चढायला सुरवात केली.

तासाभराच्या अथक शोध मोहिमेनंतर झाडाझुडपात दडलेल्या उकसनच्या गुहा लांबून दिसल्या; डोंगर माथ्य पासून ५० मीटर खाली दाट झाडी मध्ये डोंगरात एक पोकळी दिसत होती. त्या दिशेने धावत-चालत गुहेच्या तोंडाजवळ येऊन थांबलो.
आज पर्यंत बऱ्याच लेण्या पहिल्या होत्या पण हे सगळ नवीन होत आमच्यासाठी. डोंगर पोखरून ती जागा बनवली गेली होती.
डोंगर माथ्यापासून ५०-६० फुट खाली नैसर्गिक पोकळी खोदून आणि तासून अंदाजे ३ मी उंच, ४ मी रुंद आणि १० मी आत नेली आहे. लेण्यांच्या तोंडाजवळ डाव्या बाजूला चौकोनी आकारात एक माणूस बसेल इतक मोठा भाग कोरलेला आहे. त्याच्या बाजूला एक कृत्रिम पोकळी कोरली आहे. उजव्या बाजूला पाया जवळ काही भाग कोरला आहे; प्रथम दर्शी तो चौथरा वाटतो. गुहेच्या शेवटच्या टप्प्यात गोलाकार आकारात कोरलेली दिसते. या व्यतिरिक्त इकडे काही दिसले नाही. उकसनच्या गुहेबाहेर आलात कि तिकडून खूप सुंदर उकसन जलाशयाचा परिसर दिसतो.

वर आलो त्या वाटेने आम्ही खाली गावात उतरलो आणि पाले गावाच्या दिशेने गेलो. पाले गावाच्या जवळून पाल लेण्यांना जायला मार्ग आहे तसेच उकसन लेण्यापासून दक्षिणेला डोंगरमाथ्याने चालत तासाभरात पाल लेण्या गाठता येतात. वेळेअभावी आम्ही पाले गावाजवळचा रस्ता निवडला. पाले गाव उजवीकडे सोडून डाव्या बाजूच्या डोंगरावर २०मिनिट चढाई केल्यावर ये लेण्या दृष्टीस पडतात.

पाल लेणी दिसायला उकसन लेणी सारखीच जरी असली तरी या मध्ये मात्र खूप काही पाहण्यासारख आहे. हळू हळू जस-जस आत जाऊन तस-तस अनेक गोष्टी दृष्टीस पडल्या. पाल गुहा सुद्धा जवळपास १० मीटर आत खोदली गेली आहे. थोडस आत गेल्यानंतर उजव्या बाजूला खोदलेल्या पायऱ्या दिसतात, त्याच्याच वर कोरीव चौथरा आहे आणि त्याचायचं बाजूला जवळपास ३ फुट खोल पाण्याच टाक आहे. विशेष म्हणजे त्याच्या वर एक ब्राम्ही लिपी मधला शिलालेख आहे; कदाचित तो लेख त्या पाण्याच्या टाक्याला अनुसरून असावा.
डाव्या बाजूला सुद्धा काही तासलेले दगड दिसतात. संपूर्ण आत गेल्या नंतर उजव्या बाजूला एक विहार आहे. (विहार म्हणजे बौद्ध अनुयायीसाठी निवासी जागा.) गुहेच्या शेवटच्या भागात एक चौथरा कोरलेला आहे जिथे एक माणूस बसू शकेल इतका.

इत्यादी सगळा अनुभव घेऊन मी आणि राहुल लेण्याच्या बाहेर निघून आम्ही खाली पाले गावात उतरलो आणि थेट जांभिवली मधल्या कार्यक्रमासाठी गेलो.

Written By

Vishal Kakade

What do you think about this post?
Share your thoughts. Please, leave A comment.

5 Responses
 1. Savita Kanade

  विशाल, प्रथमत: तुझे आणि राहुलचे अभिनंदन! गावकऱ्यांना माहित असूनही त्यांच्याकडून कदाचित त्याचे महत्व माहित नसल्याने न जोपासला गेलेला हा बहुमुल्य खजिना तुम्ही शोधून काढलात. तो शोधून काढणे नक्कीच सोपे काम नसणार आहे. गावापासून दूर आणि निर्मनुष्य ठिकाणी , सहसा कोणाचे लक्ष जाणार नाही आणि गवताने वेढलेल्या ह्या लेण्या गवत बाजूला सारून, प्रसंगी गवत उपटून काढून, टेकड्या चढून शोधताना निश्चितच भयावह कार्य असणार. लेण्यामध्ये आत शोध घेतानाही कदाचित भय वाटले असण्याची शक्यता आहे.

  हे काम तुम्ही दोघानीच, साहसाने, धैर्याने आणि शोधक दृष्टीने केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ह्या लेण्या दृष्टीस पडल्यानंतर तुम्हाला काय जाणवले असेल ह्याची कल्पना आणि भावना मी अनुभवू शकते.

  मला काही सूचना आहेत, तुम्ही त्यावर विचार करावा असे वाटेत..

  विशाल, तू स्वस्थ बसणार नाही ह्याची मला खात्री आहे. तेव्हा खालील मुद्द्यावर तू नक्कीच विचार केला असशील. त्याबद्दल खास कौतुक!

  ह्या लेण्याची माहिती पेपरमध्ये छापता येईल का?
  ब्राम्ही लिपीत लिहिलेल्या शिलालेखाचा अर्थ तज्ञ व्यक्तीकडून समजावून घेता येईल का?
  ह्या लेण्याचे काही संदर्भ शोधता येतील का?
  लेण्याचा कालावधी आणि त्यांचे महत्व /उपयोग माहित करून घेता येईल का?
  गावामध्ये ह्या लेण्याबाबत एक ग्रामसभा घेऊन त्याचे जतन आणि निगडीत काही माहिती सांगून गावकऱ्यांमधे त्याबाबत जागरूकता निर्माण करता येईल का?

  लेणी शोधन प्रक्रिया छान वर्णन केली आहेस.

  Keep exploring! keep documenting!

  पण तिथेच थांबू नकोस!

  अशीच शोधक नजर असुदे!
  खूप खूप शुभेच्छा!

 2. संजय

  सुंदर लेख….मावळ तालुक्यात विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पाटण गावाजवळ अशीच एक दुर्लक्षित छोटी लेणी आहे… येलघोल गावाच्या वर सुध्दा एक छोटी लेणी आहे.

Leave a Reply