मावळत्या वर्षाबरोबर आठवणींचा खजिना रिता करावा लागतो. २०१९ हे वर्ष माझ्यासाठी अतिशय उत्साहाचं आणि समाधानाचं राहिलं. या वर्षी एक नवीन छंद जडला. या वर्षी म्हणजेच माझ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. एकामागोमाग एक मी ट्रेक करत राहिलो आणि माझी यादी वाढवत राहिलो. बरेच जण विचारतात की ट्रेक केल्यानंतर अस काय मिळतं. शनिवार रविवार मस्त घरी राहण्याऐवजी उठसूट डोंगर चढण्यात काय कौतुक. त्यांना आज सांगावंसं वाटत आहे म्हणून थोडंस –
मी तसा खुप आळशी प्राणी आहे. पण सह्याद्रीतले डोंगर कधीच मनाला स्वस्थ बसू देत नाहीत. ट्रेक नंतर शूज, कपडे, बॅग्स सगळं खराब होत पण तरीसुद्धा पुढच्या वीकेंडला ट्रेक करायचं आहे त्यासाठी सगळं धुवून ठेवण्यासाठी कुठून ताकद येते, कुणास ठाऊक. मला खरतर ट्रेक मधून माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते. बरेचदा परिस्थिती फार प्रतिकूल असते, पाय मुरंगळलेला असतो, जवळच पाणी संपत आलेलं असत, अंधार पडत असतो पण अशा प्रसंगी सुद्धा संयमी राहणं मला इथे कळतं. कितीही थकलो तरी ठरवलेल अंतर पार केल्याशिवाय न थांबण्याची वृत्ती तयार होते. सर्वांसोबत एकाच दिशेने कोणत्याही परिस्थितीत पोहोचण्याची जिद्द लागते.
जेवणासाठी नखरे करणारा मी इथे मात्र भेटेल ते सर्वांसोबत वाटून घ्यायला शिकतो. स्वतःच्या दमछाक करणाऱ्या, वाढणाऱ्या श्वासागणिक सभोवतालच्या परिसराबद्दल विचार करण्यास मजबूर होतो. कसे राहतात इथले लोक, या आदिवासी पाड्यांवर कोणत्याच सुविधा नाहीत. ना वीज, ना 24 तास पाणी. गावात दिवसातून एखादीच बस येत असते. मोबाईल नेटवर्कचा तर काही पत्ताच नाही. पण तरीसुद्धा इथली माणसं श्रीमंत वाटतात. निसर्गाने तर ते श्रीमंत आहेतच पण मनाने सुद्धा ते श्रीमंत असतात. वाट चुकली असते तेव्हा रस्ते सांगताना, पाणी देताना (जे त्यांनी ४/५ किलोमीटर वरून आणलं आहे ते), जेवणासाठी सोय करताना ते जेवढी आपुलकी दाखवतात ती शहरात शोधून सापडणार नाही. आपल्या येण्याने तिथले माणस जशी चलबिचल होतात तसेच तिथले पक्षी आणि प्राणीसुद्धा.
गावातील एखाद कुत्रं आपल्याला सबंध प्रवासात वाटाड्या बनून सोबत करतच. जंगलात जसे आपण चालत असतो तसे संपूर्ण जंगल आपल्याबरोबर चालत आहे असे वाटते. प्रत्येक ठिकाणी आपल्या आगमनाची वार्ता हे पक्षी पुढे पाठवत असतात. माकडांसारखे प्राणी आवाज काढून वनराई जागी करतात. आपण त्यांच्या घरात त्यांना न विचारता शिरलेलो असतो त्यामुळे त्यांच्या अशा प्रतिक्रिया राहणं स्वाभाविक आहे. पण आपल्या पासून काही धोका नाही हे समजल्यावर मात्र सर्व शांत होत. जंगलाची खरी मजा तेव्हा येते. वेगवेगळ्या पक्ष्यांची प्राण्यांची भेट तेव्हा होते. उंच बसलेला धनेश असो वा झाडाच्या बुंध्यावर उलटा लटकलेला शेकरू असो, सर्व सार्थकी लागल्यासारखा वाटायला चालू होतं.
एव्हाना आपण डोंगरमाथ्याला आलेलो असतो. इथे आपली भेट डोंगराशी, दऱ्यांशी, जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याशी असते. प्रत्येक जण आपल्याशी हितगुज करण्यासाठी धडपडत असतो. सर्व आसमंत न्याहाळता नजर कमी पडू लागते. निसर्गाचे चमत्कार असलेले विविध आकाराच्या डोंगररचना, त्यातुन वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि प्रपात, शरीरावरील घाम सुकवणारे वारे, आकाशात धावत असलेले ढग, आणि त्या ढगांआडून आपल्याकडे पाहत असलेले पर्वतशिखरे- सर्व मला मी जिवंत असण्याची, माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
असो या वर्षी केलेल्या सर्व सफरींची नोंद माझ्याकडे रहावी म्हणून खालील यादी लिहीत आहे.
10 Feb – Purandar Fort
30 Jun – Torna Fort
21 July – Kalsubai Peak
27 July – Rajmachi Fort
08 Aug – Harishchandragad
15 Aug – Sinhgad Fort
17 Aug – Rajgad Fort
18 Aug – Tung Fort
25 Aug – Rajgad Fort
07 Sep – Tikona Fort
10 Sep – Korigad Fort
22 Sep – Bhorgiri to Bhimashankar Trek
29 Sep – Sus Tekdi exploration
03 Nov – Moroshicha Bhairavgad Fort
10 Nov – Boratyachi Nal Descend
01 Dec – Sunrise at Sinhgad Fort
08 Dec – Dhak Bahiri Caves
14 Dec – Katraj to Sinhgad Night Trek
28 Dec – Bhairavgad Fort (Shirpunje), Ghanchakkar, Gawaldeo, Muda (Day 1)
29 Dec – Katrabai Kada, Ratangad Fort (Day 2)
beautifully written, summarised in shortest possible text.
Excellent writing Satyandhar.. keep going.. all the best dear..
Badhiya keep it up
अतिशय आकर्षक पणे मांडलेले हे वर्णन वाचून खरच ट्रेक करण्याची एक ईच्छा प्रकट होते.
Mast. Keep going
Keep trekking….keep writing….
Nice blog मित्रा… असंच लिहित रहा nehami… Keep it up