AN ओळख (अनोळख)

डोंगर भटकंती करणं म्हणजे फक्त उठायचं आणि डोंगरात चालायचं असं नसतं. आपण कोणासोबत जातो, आपले सहकारी कोण आहेत हे देखील महत्वाचं असत. त्यांचा अनुभव हा पण मोठा घटक असतो. ही सगळी समीकरणं जुळली ना मग अस्सल भटकंतीचे रंग बहरून येतात. म्हणजे मला तरी हे असे वाटतं; यात दुमत असु देखील शकतं.

कलावंतीण दुर्ग सारख्या डोंगरावरून चालत जाण जोखीम नक्कीच होती पण यात देखील आपला दृष्टिकोन, इच्छाशक्ती, धाडस अशा इतर अनेक गोष्टींचा वाटा असतो. त्यात तुमचा चमू हा केंद्रीय स्थानी असतो. त्यांची साथ अमूल्य असते, त्यांचा मानसिक आधार त्याहून मोलाचं काम करतो.

१७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आमचा ट्रेक चालू झाला. साधारण तासाभरात सगळे प्रबळमाचीला पोहचले देखील. म्हणजे निम्मी चढाई पार केली होती. माझ्यासकट एकूण २१ लोक होती आणि काही माणसं सोडली तर बऱ्यापैकी सगळेच एकमेकांना अनोळखी होते. कोणाला कोणाचं नाव माहित नाही, त्यांचा भटकंतीतला अनुभव माहित नाही. काही कोणाला कशाबद्दल माहित नसताना देखील तासाभरात सगळे एकमेकांशी हळू हळू जुळवून घ्यायला लागले.
कारण नाव, पत्ता, वय, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, ट्रेक अनुभव या सगळ्या पलीकडे जाऊन हि २१ जण एक संघ होता हे त्यांना सुरवातीपासून ते शेवटपर्यंत चांगलंच माहित होत. ज्यावेळी अनेक माणसं एखाद्या कार्यासाठी एकत्र येतात ना तेव्हा खरी कार्यसिद्धी प्राप्त होते. मग त्यातलं यश-अपयश हा सगळा नंतरचा भाग असतो. एक संघटनेची भावना खूप कणखर आणि सकारात्मक असते.

ठाकूरवाडी मधून चढाई जशी जशी वर जाऊ लागली तसं तसं काहींचा चालायचा वेग मंदावला आणि मागचं अंतर वाढू लागलं. खरतर वाट तशी मळलेली आणि थेट प्रबळमाचीला जाऊन भिडलेली; तरी पण रात्र होती म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रित वर जाणं भाग होत. पुढे चालणाऱ्या मंडळींचा वेग कमालीचा होता पण आपल्यातली काही लोक मागे राहत आहेत हे समजताच क्षणी त्यांच्या साठी थांबा घेत होते. असे अनेकदा होताना दिसत होत. सगळ्यात पुढे चालणारा जो पर्यंत शेवटच्या माणसाचा आवाज ऐकत नाही तो पर्यंत तो एका जागेवरून हालत नव्हता. असे करता करता प्रबळमाची केव्हा आली कळलंच नाही.

जरा वेळ पथाऱ्या पसरवून चहाचा घोट घेत पहाटेच्या गारव्यात पुढच्या चढाईला निघाले. प्रबळमाची गाव जेमतेम २५-३० घरांचं आणि इथूनच २ मुख्य वाटा जातात. एक सरळ खिडींत जाणारी कलावंतीण कडे तर उजवीकडची प्रबळगडाच्या दिशेने. गावातून कोणी चुकून दुसऱ्या वाटेल जाऊ नये म्हणून सगळेजण प्रत्येक २ पडवीनंतर आपली माणसं सोबत आहेत याची खात्री करून घेत होते. हळू हळू गाव मागे सोडून चढण लागली आणि एका झोपडी वजा हॉटेल समोर सगळे थांबले.

इथे येई पर्यंत एक संघटित होऊन सगळे मिसळले होते. कोणी कोणाला बसायला जागा देई, कोणी आपलं पाणी देत होत तर काहीजण आळीपाळीने झोका खेळू लागले त्यातच कोणी हक्काने सांगे कि पहाटे उजाडलं कि राहिलेली चढाई करू म्हणजे आपण सुखरूप माथ्यावर पोहचू. हि एकात्मता, काळजी, माणुसकी आणि संघटित वृत्ती सगळ्यांना आनंद आणि उमेद देणारी होती.

सकाळ झाली होती; सूर्य काही वेळाने वर डोकावणार होता. तोच आम्ही कलावंतिणी सुळक्याची चढाई चालू केली. आता मात्र खरी कसोटी होती. पायऱ्या चढत असताना तुमचा आत्मविश्वास ढळता कामा नये. सकारात्मकतेने एक एक पायरी जिद्दीने चढून गेलं पाहिजे आणि नेमकं हेच झालं. ज्या ठिकाणी अशा साथीदारांची साथ लाभते ना तेव्हा समोरचा प्रवास कितीपण खडतर असला तरी आपण सामोरे जातो.

पायऱ्या चढत असताना कुठे पाय ठेवायला पक्की जागा आहे, शरीर नेहमी कातळाजवळ ठेवा, तोल सांभाळत हळू हळू चाला अशी वाक्ये कानावर पडू लागली. ज्या ठिकाणी अति अवघड भाग आहे त्याठिकाणी आपल्या सोबत्यांना सुखरूप पुढे जाऊ देणं या धाडसाला काळजीची गाठ बांधलेली असते. अशा वेळी तुमचा आत्मविश्वास दुप्पट होतो आणि भीतीवर तुम्ही मात करता.

पायऱ्या संपल्या होत्या आणि शेवटचा साधारण २० फुटांची खडी चढण बाकी होती. प्रस्तरारोहणाच्या साहित्याशिवाय ते चढण अशक्य आहे. वन विभागाने एक दोर लावलेला होता त्याला धरायला गाठीही बांधल्या होत्या. लांबून बघताना दिसायला सोप्प वाटतं पण जेव्हा कातळ डोळ्यासमोर येतो तेव्हाच समजत आपल्याला शारीरिक आणि इच्छाशक्तीच्या जोरावर वर यशस्वी चढायचं आहे. निम्मा संघ वर आला आणि काही जण खाली राहिले. कोणाची शारीरिक तर कोणाची मानसिक क्षमता कमी पडू लागली. अशा वेळेला तुम्हाला धीर देणारा आवाज हवा असतो. आपण हे करू शकतो असे सांगणारं कोणीतरी पाहिजे असते, आपल्या इच्छेला शक्ती देणार कोणीतरी शक्तीदाता हवा असतो. अशा वेळी तुमचं मन आणि शरीर एकत्र येणं जास्त गरजेचं असत.

आपण इथं पर्यंत आलो आहोत इथून खाली परतलो कि मनामध्ये एक प्रकारचा पश्चाताप नाही राहिला पाहिजे, तुम्ही करू शकता, शरीरवर खेचा, करा आणि करा’च’ अश्या वाक्यांनी सगळं नियंत्रितपणे पार पडायला मोलाची मदत झाली आणि सगळे सुखरूप कलावंतीणीच्या माथ्यावर पोहचले.

“श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय” या वाक्याने स्फूर्ती अजून चढवली आणि सगळे खायला बसले. अनेकांनी अनेक आगळे वेगळे पदार्थ आणले होते, सगळे जण थोडे थोडे चाखून स्वाद घेण्यात रमून गेले. त्यातच काही जण फोटोग्राफी मध्ये रमले.

मनसोक्त (स्वतःला ) वेळ देऊन आम्ही खाली उतरायला चालू केलं. तो पर्यंत खालून काही अजून लोक वर चढत होते. आम्ही सोबत आणलेला दोर बांधला आणि एका कपारी मार्गे उतरायला चालू केलं. नेहमीच्या वाटेपेक्षा किंचित अवघड होत पण हळू हळू आम्ही तो पूर्ण केला. निम्मा संघ पायऱ्या उतरायला पुढे गेला तर निम्मा शेवटच्या माणसाची वाट पाहत थांबले होते कि तो सुखरूप उतरतोय कि नाही. सरतेशेवटी सगळे सुखरूप प्रबळमाची मध्ये पोचले.

श्रीहरीचे नामस्मरण करून अस्सल गावरान शाकाहारी भोजनावर मस्तपैकी सगळ्यांनी ताव मारला वरून शेणाने सारवलेल्या जमिनीवर तासभर ताणून झोप काढली. काहीवेळात खाली पायथ्याला उतरायला चालू केलं आणि तासाभरात सगळे पोचले देखील.

तात्पर्य असे कि कोण कुठची हि २० लोक; नाव-गाव-ठिकाण माहित नसताना देखील एकमेकांना आपलंस करून गेली. जर कोणी जास्त दमला असेल तर बसायला जागा आणि प्यायला पाणी देत होते,आराम करायला चांगली जागा शोधून देत होते, धोक्याच्या ठिकाण स्वतः उभा राहून पुढे जायला जागा देत होते, अवघड कातळावर जीव टांगणीला लावून वर यायला मदत करत होते, वर पोचल्यावर आपला आनंद साजरा करत होते, सफरचंद, पराठा, पेरू, म्हैसूरपाक, चिवडा इ. सगळं वाटून वाटून खात होते. त्यात उतरताना एकमेकांची विशेष काळजीही घेत होते.

१२ तासाआधी एकमेकांना न ओळखणारे, १२ तासानंतर एकमेकांबद्दल मैत्रीपूर्ण भावनेने बांधले गेले होते. तरीदेखील अजूनही काहींना काहींची नाव-गाव-ठावठिकाणा माहित नव्हता. आता याला “अनोळख” म्हणायचं कि “An ओळख” तुम्हीच ठरवा.

राम राम ।।
———————————–
फोटो साभार : प्रवीण पाटणकर, प्रणय हेगडे

Written By
Vishal Kakade

Leave a Reply

Contact us
Welcome, we are happy to help you!
Team SG-TrekkersWhatsApp
Mon-Fri, 08:00 - 21:00Call usPhone
contact@sgtrekkers.inEmail usEmail
Send this to a friend