लो-भीचा प्रेमळ प्रवास…

लोणावळा ते भीमाशंकर चा ट्रेक विशेष आहे! भटकंती करणाऱ्या रसिक मायबाप भटक्यांसाठी तर विशेषच आहे कारण आपण एक लांबचा पल्ला ठराविक वेळेत गाठतो, सह्याद्रीची मुख्य डोंगररांगेतून बऱ्याच वेळा चढ-उतार करतो, कुठे लांब पसरलेलं पठार लागत तर कुठे घनदाट अरण्य! मधेच कुठेतरी विरळ जमीन दिसू लागते तर कुठे सरळ कोकणात उतरणारे कडे!
राजमाची, ढाक, भिवगड, पेठचा किल्ला, तुंगी, पदरगड, माणिकगड, पेब अशा किल्ल्यांची आरास लागलेली दिसते. त्यातच भर म्हणजे शिरोटा धरणाचा फुगवटा, कुसूरच पठार, ढाकच पठार समोर माथेरानची डोंगररांग, बोरघाटाचा काही भाग असे एक ना अनेक सह्याद्रीचे अंग आपल्याला या प्रवासात नेहमी सोबत करत असतात; म्हणूनच रसिक भटक्यांसाठी हि विशेष पर्वणीचं आहे!

पण हि भटकंती विशेष+खास केली ती सोबत असणाऱ्या सवंगड्यानी… थांबा थांबा मी फक्त आमच्या चमू बद्दल बोलत नाहीये तर वाटेत भेटलेल्या त्या प्रत्येक सजीवाबद्दल बोलतोय. पुण्यापासून ते पुण्यात येई पर्यंत भेटलेल्या सगळ्यांबद्दल! आता कसे ते पुढे वाचा…

मी धरून आम्ही अकरा जण लोणावळ्यात पोचलो. लोणावळा शहर मात्र झोपलं होत पण शहराचा मध्यभाग अजून जागा होता. रात्री १२ नंतर शटर खाली करून चालू असणार उडप्याच्या हॉटेल मध्ये पहिला विनंती विशेष थांबा झाला. एव्हाना सगळ्यांना भूक लागली होती. मालक आणि वेटर काकांनी इतक्या रात्री दिलेले ताजे आणि गरम डोसे आमच्या पोटात गेले तेव्हा कुठे वळवंडला पोहचू असे वाटलं. नाहीतर रात्रभर आमच्या गाडीने पोटात कुरकुर केली असती. धन्यवाद त्या अन्नदात्यांचे !

लोणावळा वरून तुंगार्ली धरणापर्यंत रस्त्यांवरच्या कुत्र्यांनी वाचमनच काम अगदी चोख बजावलं. धरणाच्या पुढे मात्र अंधार वाढला होता आणि विजेरीच्या साह्याने चालावं लागणार होत. कसबस स्वतःला रेटत आम्ही ३ तासांनी वळवंड गावात पोचलो. मारुतीच्या मंदिरासमोर जे आम्ही पसरलो ते सकाळीच उशिराने डोळा उघडला. पण एका अर्थी बरं झालं होत; सगळ्यांची पूर्ण झोप झाली होती.

सकाळी ८ वाजता गायकवाडांच्या पडवीत उभ्यानेच पोह्यावर ताव मारला कारण ते तेवढे चविष्ट झाले होते. इतके कि आम्ही डब्ब्यात घेणार होतो पण मनाला आवर घालत आवरायला घेतले. मनापासून जेवण बनवलं कि पोट भरायच्या आधी मन भरतं आणि जिंकुन पण घेता येत. हा नैसर्गिक नियम आहे ज्याला समजला त्याला समजला बाकी जय श्री कृष्ण!
गायकवाड कुटुंबाचे धन्यवाद करून पुढचा प्रवास चालू केला.

आता यापुढे मात्र सह्याद्री रंग भरत होता; अगदी रांगोळी मध्ये भरतात ना तसं. सगळीकडे लांबवर हिरवाई पसरली होती, डाव्या अंगाला मांजरसुबा डोंगर तर समोर ढाकच पठार आणि किल्ला, भिवगड यांनी धुक्यातुन ताठ माणा वर केल्या होत्या. जवळच कुठं लाल तेरडा तर कुठे सोनकीच पिवळं रान मधेच कुठेतरी पांढऱ्या पंद फुलांनी गालिचा तयार केला होता.
मध्येच एका ठिकाणी बिबट्याची चाहूल दिसली. पहाटेच इकडं फिरकुन गेला होता तो. त्याची पावलं स्पष्ट सांगत होती.

११ नंबरची गाडी चालूच होती. कुसूरच पठार जवळ आलं होत. भलं मोठं विस्तीर्ण पठार आहे हे. पूर्व-पश्चिम अंदाजे १८-२० किमी पसरलं आहे. आम्हाला मात्र दक्षिण-उत्तर अंदाजे ३ किमी चालून पार करायचं होत.
पठारावर पोहचायच्या आधी ५५ वर्षांची २ तरणी माणसं भेटली. जवळच्या जांभिवली गावातून आले होते. त्यांनी गायी चरायला आणल्या होत्या. १० मि आम्ही त्यांच्या सोबत गप्पा मारत होतो. खाल्लं का? पाणी घेतलं का? त्यांच्या या प्रश्नांनी माणुसकीची खरी जाण झाली उमगचं म्हणा ना! भावनिक संभाषण शिकावं तर डोंगरातल्या माणसांकडूनच. असो आम्ही सभोवतालची आणि वाटेची माहिती विचारून त्यांना निरोप दिला.

एक भला मोठा खांब या पठारावर शासनाने लावलेला आहे तिथून खाली कुसूर गावात उतरायला वाट आहे. उतरायला चालू करायच्या आधी धनगरवस्ती लागली अगदी २-३ घरांची. तिथं आंबट-गॉड ताकावर ताव मारत एक झोप काढायचा मोह झाला होता. पण वेळेच्या १ तास पुढे होतो आम्ही. पण ती जागा मात्र खास होती; जर पाठ टेकवून डोळा लागला असता तर माहित नाही कधी जाग आली असती कदाचित कोंबड सुद्धा आरवलं असत.

कुसूर गावाच्या अलीकडेच आमच्या सारख्याच काही डोंगरभाऊंची गाठभेट झाली. हि भेट डोंगरातच उत्तम नाहीतर पुण्यात चहाच्या कट्ट्यावर उग कप रिकामे होतात. असो.
कुसूर गावात हौसा मावशीकडे झणझणीत भाजी-भाकरीवर ताव मारत अर्धे डोळे मिटत जीप मध्ये बसलो. आणि तळपेवाडीला उतरलो. हा झाला पहिल्या दिवसाचा अर्धा प्रवास आणि संध्याकाळचे ४ वाजले होते. डोंबल्याचा अर्धा प्रवास. हा तर पुढे…

गावात बिन दुधाचा चहा घशाखाली उतरवला आणि वांद्रे खिंडी कडे चालू लागलो. वाटेत भातखाचराने वाटा बुजल्या होत्या. स्थानिक शेतकरी लांबून ओरडून आणि हातवारे करून खिंडीची वाट दाखवीत होते.

तळपेवाडी गाव आता बरंच मागे सोडलं होत आम्ही. मधेच एकाठिकाणी भला मोठा जिवंत धबधबा मनात घर करत होता. पटकन ३-४ फोटो काढून काढता पाय घेतला. आता अंधार पडू लागला होता आमच्या विजेऱ्या बाहेर निघू लागल्या. अंधारातच खिंड पार केली पण पदरात आल्यावर भातखाचरांमध्ये अडकलो. नक्की कोणती वाट पडरवाडीत जाते कळेना झालं. एका फोनवर गावातला होतकरू सोपान झटकन आमच्या जवळ येऊन पोचला.
देवा सारखाच पटकन आला तो. त्याने त्याच्या घरी आणलं. बॅगा खाली टेकवून जे टेकून बसलो ते अर्ध्या तासानेच उठलो. हात-पाय थोडेसे धुवून घरात गेलो.
यजमानांनी सगळी सोया केली होती झोपायची आणि जेवणाची.

सगळ्यांनी एक-एक झोप काढली. मी आणि प्रथमेशने गुलाबजाम वळायला आणि तळायला घेतले. चुलीवर हे काम चालू असताना भवारी दाम्पत्य तिथेच होते. मस्त गप्पा रंगल्या होत्या. स्थानिक जनजीवन, आयुर्वेदिक वनस्पती, इतर ट्रेकर मंडळी हे त्यांचे विषय. शहरीजीवन, काही अनवट भटकंतीचे वर्णन हे आमचे विषय. आमच्या भटकंतीचे किस्से कुतूहलाने ऐकत होते ते दोघे. जवळजवळ १ तास माहोल रंगला होता आणि गुलाबजाम तळायच्या नादात तेलाचे २ थेंब माझ्या उजव्या गुडघ्यावर येऊन टपकले तेव्हा काही जाणवलं नाहीअन नंतर बराच वेळ मला काही सुधारलं नाही. असो.
गुलाबजाम तळुन गार करायला ठेवले आणि बाकीच्यांना झोपेतून जाग करत आम्ही पण जेवायला बसलो.

बाजरीची भाकरी, राजम्याची भाजी, पिवळा बटाटा आणि वरणभात.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरची झोपेची धुंद उतरते ना तोच सगळे बेधुंद झाले. नशा काय वाईट गोष्टींची थोडीच असते चांगल्या गोष्टींची पण असतेच कि. अशी समजूत घालत पॉटभर जेवलो. वरण तर मी वाटी-वाटी पिऊन टाकलं. इकडं खाल्लं कि तिकडे झोपून गेले सगळे.
दिवसभर जवळपास ३२-३४ किमी चालून, स्वादिष्ट जेवण फस्त करून कोणाला पण गाढ झोप लागल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यात भवारी कुटुंबाने मन जिंकली होती. चवीष्ट जेवण करूनच नाहीतर आमचं जेवण होई पर्यंत आम्ही अंथरूणात झोपे पर्यंत हे कुटुंब एक घास सुद्धा जेवले नाहीत. जेवून घ्या तुम्हीपण आमच्या सोबत तर म्हणे, “तुमचं सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय आम्ही कसं जेवणार?”; आता काय बोलणार!

बऱ्याच दिवसांनी सह्याद्रीतले अस्सल माणस भेटली होती. पाहुणचार काय असतो?, पाहुणे म्हणजे काय? या प्रश्नांची भावनिक भाषेत उत्तर देत आमच्या मेंदूवरची धुळ साफ केली. या सगळ्या मध्ये कुठेतरी कमी राहिली कि काय म्हणून सकाळी पोटभर जिभेवर चव रेंगाळेल असे पोहे आणि चहा. सरतेशेवटी निरोपाची वेळ आली होती. अगदी मनापासून त्यांचे आभार मानत पडरवाडीतुन काढता पाय घेतला. काका आम्हाला गावच्या वेशीपर्यंत सोडायला आले. अन पुढची वाट तोंडी सांगत आम्ही आमच्या माना डोलावल्या.

आता यापुढचा प्रवासात आम्हाला वाट थोडी वाकडी करून कड्याजवळ खेतोबा गाठायचा होता. २ तासाभराच्या चाली नंतर आम्ही खेतोबा मंदिराकडे कडे पोचलो. सूर्य माथ्यावर येऊन थांबला होता. काही क्षण घालवीत आम्ही पुढची चाल धरली. इकडे थोडी गडबड नक्कीच झाली होती पण शांत राहून सभोवताल आणि नकाशाची उजळणी केली कि वाट सापडली एकदाची.

येळवळीच्या गावाच्या अलीकडे भिमानदीला जोडणारा एक प्रवाह चक्क प्रेमात पाडून गेला. अमोल सरांच्या पुढाकाराने सगळ्यांनी आपले आपले वस्त्र आपल्या शरीरापासून वेगळे करत यथासांग प्रेमानंद घेत डुबक्या मारल्या. सकाळपासून चालू असलेली पायपीट, वाढलेलं ऊन, पुढचा पल्ला या सगळ्यांना मोठ्ठा ब्रेक मिळाला. प्रवाहाच थंडगार पाणी, उन्हाचा कवडसा यामुळे तिथून बाहेर निघू वाटेना. आम्ही सगळे रमलो होतो तिथे. प्रत्येकजण लहानमुलांसारखा आनंद घेत होता. सगळ्यांमधलं लहान मुल त्या पाण्यात डुंबत होत, पोहत होत, खेळत होत. सगळ्यांना बालपण आठवलं असणार यात तिळमात्र शंका नाही.

पुढचा पल्ला हा शेवटचा होता. येळवली गाव – कमळजाई मंदिर – भीमाशंकर जंगल आणि मंदिर हा साधारण २ तासांचा टप्पा सगळ्यांनी या आठवणींनीना उजाळा देत संपवला. सगळे शरिराने थकले नक्कीच होते पण सगळ्यांची मन मात्र वळवंड पासून भीमाशंकरच्या मध्ये गटांगळ्या खात होत.
भुकेल्या पोटात २ घास टाकले आणि महामंडळाच्या वाहणाने पुण्य-भूमी गाठली.

हा सगळं प्रवास डोक्यात चक्राकार फिरत होता; इतकी अनोळखी माणसं आमच्या मध्ये मिसळून आपुलकीची भावना देत होते. त्यात आमचा चमू पण लय भारी होता. खूप लवकर एकमेकांशी गट्टी जमली होती. अशी गाठ एकदा बांधली कि भटकंतीचा पल्ला किती पण मोठा असू द्या. काही फरक पडत नाही. एकी हेच बळ आणि पाठबळ सुद्धा.

वैभव सर पाठदुखी ने त्रस्त आणि अमोल सर सर्दी, पडसं ने या अवस्थेत तुम्ही दोघांनी हा पल्ला अगदी उत्साहाने, सकारत्मकतेणे आणि जिद्दीने पूर्ण केला. अमोल सरांच्या उत्साहाला तर विशेष दाद ! विवेक पाठक सर सातत्याने ४०-४५ ट्रेक औरंगाबादवरुन पुण्यात येऊन पूर्ण करणे म्हणजे कमालीची इच्छाशक्ती, आवड आणि सह्याद्रीप्रती प्रेम लागत. मस्त सर.आकाश-शशांक हि जोडगोळी पूर्ण भटकंती मध्ये हसतमुख होती. मराठी येत नसूनही त्यांनी ज्याप्रकारे सहभाग घेतला तो वाखाणण्याजोगा होता. जस मीठ पाण्यात सहज वीरगळत तसच अगदी. आनंद सर आणि दीपक सर यांनी कुसूर मधून माघार जरूर घेतली होती तरी आम्ही कोणीच तुम्हाला विसरलो नव्हतो शेवटपर्यंत. अंबानी म्हणजे अजित भाऊंचा स्वॅगच वेगळा होता. याला अंबानी का म्हणतो याच एक उदाहरण देतो, आपण सगळे ट्रॅक पॅन्ट घालतो आणि हा “जॉग्गर्स पॅन्ट” घालतो. यातला फरक तो आणि देव जाणे. असे एक ना अनेक उदाहरण. अजून एक म्हणजे डाईट भेळ खातो हा पठ्ठ्या. हाहा. आता काय म्हणावं याला. असो. पण चांगला मित्र झाला तो या भटकंती नंतर. मारुती शांत अन गुणी पोरग. सह्याद्रीच वेड लागलेल अजून एक उदाहरण याच्या रूपानं दिसलं; असच भटकणं चालू ठेव. प्रथमेशचे सोबती महेंद्र आज नव्हते म्हणून सुरवातीला त्याच्या सोबत मला पण खटकून गेलं. रांगड्या सह्याद्रीत मनसोक्त भटकायला एका पायावर तयार असणारा सोबती. आणि म्या येडं गबाळ पोर.

या सगळ्यांत एक जण होता जो कोणाच्या ओळखीचा नाहीये, माझा मित्र सौरभ.
ट्रेकला सोबत नव्हता पण त्याच यात प्रमुख योगदान होत. या ट्रेकच्या आधी मुसळधार पावसात लो-भी ट्रेक मध्ये येणाऱ्या गावांच्या मार्गावर दिवसभर आम्ही सोबत गाडीवर प्रवास केला. ट्रेकच्या आयोजनात मुख्य भागीदार होता. अस्सल भटक्या आहे… शेवटी दोस्त कोनाचाय ?????????????

तर हे सगळं असे मंडळ जमलं होत… एकदम तंद्रीत! मग का नाही होणार ट्रेक विशेष!

Written By

Travel.wish

Leave a Reply